kopargaon

कोपरगांवची महाशिवरात्रि जत्रा | सांस्कृतिक परंपरा

कोपरगांवची महाशिवरात्रि जत्रा

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथून उगम पावलेली, गौतमऋषींना गोहत्या पातकातून मुक्त देणारी, पापक्षालन करणारी आणि गंगेची थोरली बहिण मानली जाणारी गोदावरी नदी ज्या तालुक्यातून वहात पुढे जाते, त्या गोदावरी नदीच्या पश्चिम-उत्तर तीरावर वसलेले गांव म्हणजे कोपरगांव… श्रीसाईबाबांच्या शिर्डीवरुन मनमाड कडे जातांना सुमारे १४ किलोमीटरवर असलेले, शहरीकरणाकडे वाटचाल करणारे व जवळपास लाखभर लोकसंख्या असलेले हे तालुक्याचे ठिकाण होय. पौराणिक धर्मग्रंथ आणि शास्रीय विशेष महत्त्व असलेल्या याच ठिकाणी कोपरगांवची महाशिवरात्रि जत्रा भरते.

पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा

गुरु शुक्राचार्य यांनी तपोबलाने त्यांची कन्या देवयानी आणि कचदेव यांचे विवाहसाठी काळ, वेळ आणि मुहुर्त या पलीकडे जावून सर्व प्रहर आणि सर्व काळ विवाहासाठी सिध्द केलेली भूमी म्हणजे बेट-कोपरगांव. प्राचिन कालखंडातील देव-दानवांची सर्वांग सुंदर नगरी… देवाधिदेव शंकर आणि पार्वती यांचा विवाह माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी झाला…ही तिथी म्हणजे “महाशिवरात्रि”. हा दिवस शिवभक्त मोठ्या उत्साहात साजरा करतात…गोदावरी नदी तीरालगत गुरु शुक्राचार्य स्थान सोबत ईतिहास कालखंडात उभारलेली अनेक शिवमंदिर येथे दिसतात.

कोपरगांवचा इतिहास पाहताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य स्थापनेनंतर १७ व्या शतकात कोपरगांव भुमीत काही राजे-महाराजे यांचे वास्तव्य पहावयास मिळते. साधू-संत यांनी आपला काळ व्यतीत केला आहे. सरदार विंचूरकर हे साधारण दिडशे वर्षापुर्वी बेट-कोपरगांव चे सरपंच होते…यांचे आधिचे कालखंडापासून बेट आणि कोपरगांव येथे महाशिवरात्रीची यात्रा भरवली जात असे.

यात्रेतील जुन्या आठवणी आणि दळणवळण

इतिहास कालखंडात महाशिवरात्री यात्रा म्हणजे बेट-कोपरगांवकरांना मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक पर्वणी असायची…भल्या पहाटेच गांवकरी गोदावरी नदीपात्रात स्नान करुन बेटात मार्गस्थ होत. गोदावरी नदी बारमाही दुथडी भरुन वहायची. या वेळी नदीच्या पाण्यावर “नाव” प्रवासी ने आण करत. मनुष्य, जनावरे, बैलगाडी ऐल तीरावरुन पैल तीरावर जाणारी नाव म्हणजे इंग्रजांचे पाण्यावरील रोप-वे तंत्रज्ञानाची चुनुक होती. नाव वल्हवण्यासाठी खलाशी म्हणून “तांडेल” (महादेव कोळी) लोक करत असे. कालांतराने नदी पात्रात होडी आली. हा तांडेलांनी ही जबाबदारी कहार बांधवांना दिली. नदी पात्रात पाणी कमी असेल तर पाण्यातून पायी प्रवास भाविक करत.

बेट भागातील देवस्थाने आणि शिवभक्ती

बेट भागातील श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (कोकमठाण), गुरु शुक्राचार्य मंदिर कोपरगांव, श्री कचेश्वर मंदिर, संजीवनी विद्या पार, श्री गणेश मंदिर, श्री विष्णु मंदिर, श्री दत्त मंदिर, श्रीमंत पवार सरकारचे श्रीमंत महादेव मंदिर असे बेट भागातील दर्शन करुन कोपरगांव शहरातील श्रीमंत पवार सरकारचे सोमेश्वर महादेव मंदिर (सराफ बाजार), श्री महादेव मंदिर (वेस जवळ), रामेश्वर महादेव मंदिर (दत्तपार) या देवस्थानांचे भेट देवून शिवलिंगाचे दर्शन घेऊन घरी परतत असे. या नंतर जो-तो आपापल्या दैनंदिन दिनक्रमात व्यस्त होत असत.

इंग्रज राजवटीत तहसिलदार असलेले दत्तात्रेय (दत्तोपंत) गंगाधर जोशी यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेवून नोकरीचा राजीनामा दिला. पुढे कोपरगांव येथे मोठे धार्मिक कार्य उभे केले म्हणून शंकराचार्य यांनी स्वतः कोपरगांव येथे येवून “धर्मभूषण” ही पदवी प्रदान केली होती. बेट परिसरात महाशिवरात्र जत्रा भरवण्यात त्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे. शिवभक्तीत लीन बाबुरावस्वामी जंगम, सोमवार उद्यापण शास्र जाणते प्रख्यात पंडित त्र्यंबकशास्री जोशी गुरु यांचे मार्गदर्शन गावकऱ्यांना शिव आराधना आणि धार्मिक कार्यात होत असे.

खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाचे सुवर्णयुग

महाशिवरात्रीच्या दिवशी निरंकार उपवास, रताळी, गूळ, केळं हीच उपवासाचे आवडीचे पदार्थ होती. महादेवाची भक्ती म्हणून शास्रोक्त उपवास मनापासून भाविक करत. जीभेचे चोचले म्हणून उपवास करणारी ही पिढी नव्हती. त्या काळात पंचक्रोशीतील भाविकही बैलगाडी, टांगा अशा वाहनाने या महादेवाचे दर्शनासाठी येत त्यामुळे पहाटे पासून रात्री उशीरा पर्यंत हा परिसर भाविकांनी गजबजून जायचा.

बेट परिसरात, बेलपानं फुलांच्या दुकाना पासून ते घरगुती वापराच्या दगडी, लोखंडी वस्तू…लहान मुलांसाठी पारंपरिक लाकडी खेळणीची दुकाने थाटायची…तसेच गुडीशेव, रेवडी यासह अनेक पदार्थ उपवास सोडण्यासाठी लोक आवर्जून नेत असत…विविध यात्रेतील आपापला परंपरागत व्यवसाय थाटणारी दुकाने असायची…गावोगावी होणाऱ्या जत्रा हेच या कुटुंबाच्या वार्षिक उदरनिर्वाहाचे साधनं होती…बेट भागातील श्रीमंत राघोबादादा यांचा वाडा होता…या वाड्यात शाहीर परशुराम ते अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावत… कोपरगांव शहरातही गावठाण भागातील महादेव मंदिराचे परिसरात वर्दळ असायची…कोपरगांव नगरीचा कारभार पहाणारे श्रीमंत महामहीम सदाशिवराव (खासेसाहेब) पवार सरकार यांनी कोपरगांव शहरात होणाऱ्या यात्रेला मोठे स्वरूप दिले. तत्कालीन हत्तीखाना मैदान (सध्याचे बाजारतळ) ही जागा गावची यात्रा आणि जत्रा सह आठवडे बाजार करता रयतेला उपलब्ध करुन दिली. आजही महाशिवरात्र जत्रा येथे भरते.

कलावंत आणि ऐतिहासिक तमाशा मंडळे

स्वातंत्र्यपूर्व काळात या यात्रा आणि जत्रेत खेळणी, फाळणी, खाद्यपदार्थ, विविध गृह उपयोगी वस्तू अशी भरगच्च यात्रा महिनाभर चालायची. यात्रेत विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, चक्री रीळचे सिनेमा, महाराष्ट्रातील दिग्गज लावणी कलावंतासह लावणीसम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगांवकर यांचा तंबू हमखास असायचा. या सोबत काळु- बाळु, कांताबाई सातारकर, दत्तोबा तांबे, विठाबाई भाऊ मांग, तुकाराम खेडक, रसुलभाई पिंजारी असे अनेक राष्ट्रपतींनी गौरवलेले तमाशे या कोपरगाव नगरीत येत असत…भेळ-भत्ता, मेवा-मिठाई, रहाट-गाडगे, इंजिनवर चालणारी खेळणी, मौत का कुवा या सह अनेक प्रकारच्या खेळण्या, विविध प्रकारचे करमणूकीचे साधणे व साहित्य येत असे.

भारताचा कॅलिफोर्निया आणि कृषी विकास

परंपरागत शेतीत नवीन प्रयोग…बारमाही कॅनाॅल सह वाहणारी गोदावरी नदी कोपरगांव परिसरास सुजलाम-सुफलाम केले…महाशिवरात्रीच्या पर्वात कृषीचे विकसित तंत्रज्ञानावर आधारित भव्य कृषी प्रदर्शन सुरु झाले…स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी कोपरगांवात येवून कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले…परिसरात जावून शेती पाहिली…येथील प्रगतशील शेतकरी आणि शेती पाहून पंतप्रधान उद्गारले, “हा तर भारताचा कॅलिफोर्निया!”

कोपरगांवचे पहिले नगरशेठ चुनिलाल राजाराम ठोळे यांनी गुळाच्या बाजारपेठेला चालना देण्यासाठी उभारलेली भव्य गोदामे आजही जुने सायन्स कॉलेज कडे जातांना पहावयास मिळतात. ही भव्य गोदामे त्या काळातील गुळाच्या भव्य बाजारपेठेची साक्ष आहे. जिजामाता उद्यान जवळ भवानी देवी मंदिरा समोर गुळाची मलटिप आणि कढई तयार करण्यासाठी ग्यानबा सोनबा धुमाळ यांचा कारखाना होता. यावेळचे गुळाचे मोठे मुस्लिम व्‍यापारी नुर महंमद अब्‍दुल करीम कच्‍छी आणि इतर व्‍यापारी यांच्‍या देखरेखी खाली सर्व गुळांचा लिलाव होत असे. या अशा अनेक शेती पुरक व्यवसायाने गांवाससह ग्रामीण लोकांना मोठा रोजगार उपलब्ध असायचा.

कोपरगांवचे निर्माते आणि बारा बलुतेदार

कोपरगांवची बाजारपेठ बसवणारे आबाजी महाजन, प्रगतशील शेतकरी सखाराम पाटील आढाव, पोलीस पाटील बाबुराव पाटील, निवृत्ती पाटील आढाव, ह. भ. प. बाबुराव नरोडे, डॉ. सी. एम. मेहता, पहिले वैद्य पांडोबा ठोंबरे यांनीही या जत्रेला स्वरुप दिले. सोनार गल्ली (सध्याचे सराफ बाजार) सोन्याचे देव, दागिने तयार करण्यासाठी प्रसिद्ध होती.

यात्रा आणि जत्रा यातून या गावाशी फार पुर्वी जोडलेली देशमुख, पवार, बल्लाळ, चौधरी, पाटील, आढाव, नरोडे, गवारे, रुईकर, ठोंबरे, जोशी, जंगम, कोपरे, घोडके, शेख, कुंभार, मैंदड, कासार, आव्हाड, नाईक (निंबाळकर संबंधित), विंचूरकर, शिंदे, अग्निहोत्री, गुरव, महाजन, तांडेल, महादेव कोळी, कहार, भोई, खडांगळे, नायडू, फंड, सुपेकर, लोहार, चर्मकार, सुतार (साधारण दोनशे वर्षापासून ही कुटुंब…यासह अनेक कुटुंब पुर्वीची असू शकतात…) या सह बारा बलुतेदार यांचे परंपरागत व्यवसायाने मोठी आर्थिक उलाढाल होत असत.

दळणवळणासाठी टांगा, बैलगाडी ही साधणं होती. घोडे बांधलेल्या टांगा तळ (सध्याची व्यापारी धर्मशाळेची मेन रोड बाजू) होते. तर बैलगाडी तळ हे (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ चौधरी बिल्डिंग समोर) होते.

बदलते कोपरगांव आणि सद्यस्थिती

माणसांची मनोवृत्ती बदलली आणि हौशी लोकांची यात्रा-जत्राची स्वप्न विरघळुन गेली…गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. अशी महाशिवरात्रीची जत्रा…असे दिवस इतिहास जमा झालेत. चवली-पावली पासुनचा तो काळ. स्वातंत्र्य मिळालं…काल ओघात पारतंत्र्य उपभोगलेली अन् गावाला एका उंचीवर नेणारी काही ज्ञानी माणसं मिळाली…हे कोपरगांवकरांचं अहो भाग्य!

साधारण ८०-९० दशकात वार्धक्याकडे झुकलेली पिढी…त्यांनी जोपासलेले गांव पण, परंपरा, रुढी यांचे संक्रमण पुढच्या पिढीला म्हणावे तसे झाले नाही…कदाचित तत्कालीन पिढीला गरज वाटली नसावी… काळ बदलत गेला…अनेक कुटुंबांनी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यातील वाटचालीसाठी भरल्या डोळ्यांनी गावचा निरोप घेतला…साधारण १९६०-७० काळानंतर खाजगी, सहकारी कारखाना, सोसायटी, शैक्षणिक यासह विविध नोकरी, मजुरी निमित्ताने ग्रामीण भागातील मोठा वर्ग कोपरगांव या गावासोबत जोडला गेला…बाहेरगावहून काही पोट भरण्यासाठी आले…मुळ गांवकरी त्याचे दैनंदिन भ्रमंती गुरफटला…

सन १९९८ नंतर मोठे स्थित्यंतर घडले…गावची प्रथा, परंपरा यात्रा उत्सवाने वेगळे स्वरूप घेतले…याचा ताबा धनशक्तीने स्वतःच्या नियंत्रणात आणला… जनसामान्यांना यात्रा आणि जत्रेची जागा निख्खळ मजा…ख-या गरजूंना रोजगार…हे दुर्लभ होवू लागले…थोडक्यात गावाचं गावपण हरवलं…परंपरागत गांवपण जोपासणारे आणि बाहेरुन नोकरी कामधंदा निमित्ताने मोठ्या प्रमाणात आलेले कोपरगांवकर असे मिश्र स्वरुप पहावयास मिळते.

निष्कर्ष

“जे गांव आपला इतिहास विसरते त्याचा भूगोल नक्की बदलला जातो.” या वाक्याची प्रचिती येत आहे. मुळ गांवठाण सोडून उत्तर पश्चिम दिशेला गत ३०-३५ वर्षात विस्तारलेले नवीन कोपरगांव सहज फिरुन पहा. मुळ गावाच्या दहा पटीने वाढलेले कोपरगांव दिसून येईल. कोणाकोणाशी फार ताळमेळ दिसत नाही. यातून गुन्हेगारी वृत्तीच्या होणारी वाढ, बाजारपेठेतील ढासळती व्यवस्था याचे परिणाम जाणवत आहे. कोपरगांवची महाशिवरात्रि जत्रा निमित्ताने कोपरगांवकरांनी परंपरा, रुढी यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. गांवपणाचा शोध आणि बोध घ्यायला हवा.

Share post

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top