पानिपत शौर्य दिनानिमित्त कोपरगांवच्या वैभवशाली इतिहासाचे प्रथमच जाहीर व्याख्यान संपन्न
कोपरगांव: गोदावरी नदी तीरावर वसलेल्या कोपरगांव तालुक्याला पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष महत्त्व आहे. देव-दानवांपासून, साधू-संत, शूरवीर राजे महाराजे आणि त्यांच्या वारसांच्या वास्तव्याचे वैभवशाली महत्त्व कोपरगांवकरांनी जतन करावे, असे आवाहन प्रसिद्ध इतिहास संशोधक सुमित डेंगळे यांनी केले.
पानिपत रणसंग्रामाच्या २६५ व्या (मकरसंक्रांती- १७११ ते १७६१) “शौर्य दिवस” निमित्त कोपरगांवात वास्तव्यास राहिलेल्या शूरवीरांची आणि शिवकालीन घराण्यांची ऐतिहासिक माहिती देण्यासाठी ‘गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळ’ यांच्या वतीने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दि. १० जानेवारी २०२६ रोजी कोपरगांव येथील कृष्णाई बॅक्वेट हॉल येथे हे व्याख्यान पार पडले.
प्रमुख उपस्थिती आणि सहकार्य
या कार्यक्रमासाठी श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थान (देवास ज्युनिअर) सोमेश्वर महादेव देवस्थान कोपरगांव (जि. अहिल्यानगर), अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहिल्यानगर जिल्हा शाखा, राजे जाधवराव देशमुख ट्रस्ट, आणि सूर्यतेज संस्था कोपरगांव यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कालांश राजगिरा लाडू / चिक्की (गुळ युक्त) कंपनी कोपरगांव आणि साईसेवा एम.आर.आय. व सी.टी. स्कॅन कोपरगांव यांचा या उपक्रमात सहभाग होता.
कार्यक्रमास कोपरगांव न्यायालयाचे न्यायाधीश संजय खैरनार, राजे लखुजीराव जाधवराव देशमुख ट्रस्टचे विश्वस्त राजे अॅड. अशोकराव जाधवराव (देशमुख), बयाजी नाईक जोंधळे (जहागीरदार) यांचे वंशज दिपकराव जोंधळे, श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थान (देवास ज्युनिअर) चे जनरल मुखत्यार महेंद्र पाटील उपस्थित होते. तसेच गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळाचे सुशांत घोडके, साई सेवा सिटी केअरचे संचालक डॉ. चंद्रशेखर आव्हाड, कालांश उद्योग समूहाचे रोहित काले, चंद्रशेखर देशमुख, शरदराव शिंदे, दत्तोबा जगताप, रविंद्र को-हाळकर, योगेश आढाव, मराठा पंचाचे अॅड. संजय भोकरे, नारायण अग्रवाल, शिवचरित्र व्याख्याते राजेंद्र खैरनार यांच्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्हा आणि कोपरगांव तालुक्यातील विविध राजघराण्यांतील वंशज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्याख्यानातील ऐतिहासिक खजिना
अहिल्यानगर जिल्हा ‘ऐतिहासिक वाडे व घराणी’ पुस्तकाचे लेखक सुमित डेंगळे यांनी आपल्या व्याख्यानातून कोपरगांवच्या इतिहासाचे अनेक पदर उलगडले:
- पौराणिक महत्त्व: गुरु शुक्राचार्य यांच्यापासून कोपरगांवला असलेले पौराणिक महत्त्व.
- राजघराणी: राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांचे कोपरगांव येथील कुंभारी व माहेगांव येथे देशमुखी सांभाळणारे थेट वंशज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाऊबंद मंजूरचे राजेभोसले यांची माहिती.
- पंडित निळकंठशास्री चतुर्धारी (चौधरी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास गागाभट्ट यांच्या समवेत उपस्थित असलेले कोपरगांवचे प्रख्यात पंडित.
- पानिपतचा पराक्रम: पानिपतच्या रणसंग्रामातील सरदार यशवंतराव पवार यांचा पराक्रम आणि कोपरगांव व जेूर कुंभारीचा स्वातंत्र्यपूर्व कालखंडापर्यंत कारभार पाहणारे श्रीमंत महामहीम सदाशिवराव पवार सरकार यांचे योगदान.
- समाजकार्य: पवार सरकार यांनी उभारलेली महादेव मंदिरे आणि त्यांचे अस्पृश्यता निवारणाचे कार्य.
- पेशवे काळ: ‘अटकेपार योध्दा’ श्रीमंत राघोबादादा पेशवा यांचे कोपरगांवातील उत्तरार्ध, आनंदीबाई पेशवा यांची रोजनिशीतील माहिती आणि त्यांचे पुत्र चिमणाजी व दुसरा बाजीराव पेशवा यांचे कोपरगांवात गेलेले ७-८ वर्षांचे बालपण.
- रायाजी शिंदे यांचा पराक्रम: आग्रा येथील किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सरदार महादजी शिंदे यांच्या आदेशानुसार आग्रा किल्ला जिंकून स्वराज्यात आणणारे वारी (ता. कोपरगांव) येथील पराक्रमी रायाजी शिंदे यांची माहिती.
- होळकर वंशज: श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या वंशजांचे कोपरगावनगरीतील योगदान.
कार्यक्रमाची सांगता
प्रारंभी भारतमाता पूजन आणि दीप-प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पानिपत रणसंग्रामातील शूरवीरांना आदरांजली वाहण्यात आली. लोककलावंत भानुदास बैरागी यांनी राज्यगीत गायन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. किरण पवार, आनंद टिळेकर, नंदू मेंगाणे, राहुल शिंदे, जयंत विसपुते, अॅड. जयंत जोशी, महेश थोरात, डाॅ. निलीमा आव्हाड, वर्षा जाधव, ओंकार कोळपकर, अतुल कोताडे, रविंद्र भगत, अमोल पवार यांनी परिश्रम घेतले.
स्वागत व प्रास्ताविक सुशांत घोडके यांनी केले, सूत्रसंचालन निलम मगर व प्रियंका साटोटे यांनी केले, तर आभार मंगेश भिडे यांनी मानले. सामूहिक वंदेमातरम् आणि तिळगूळ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. कोपरगांवच्या ऐतिहासिक विषयावर अशा प्रकारचे हे पहिलेच जाहीर व्याख्यान ठरले.