kopargaon

कोपरगांवचे ग्रामदैवत - संपूर्ण विषय संरचना आणि तपशीलवार माहिती

ग्रामदैवतांची संस्कृती व महत्व

ग्रामदैवताचा उगम

नदीच्या काठाने माणसांची वस्ती वाढायला लागली की तिथली संस्कृती, प्रथा, सण, उत्सव, गावाच्या जत्रा सगळ्यांना एकत्र येण्याचे कारण बनतात. त्या परिसरात जे काही उपलब्ध असते त्याचाच नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. देवाची काठी किंवा पालखी मिरवायची प्रथा सुद्धा अगदी जुन्या काळातील आहे.

माणूस अडाणीपणामुळे आणि अंधश्रद्धेमुळे या सगळ्यात कधी कधी भरकटत गेला. त्यातच साथीचे आजार, रोगराई  म्हणजे मरीआईचा फेरा असायचा. अशावेळी आपले गार्‍हाणे ऐकणारे एकमेव ठिकाण म्हणजे ग्रामदेवता किंवा ग्रामदैवत.

कोपरगांवाचा इतिहास

कोपरगांव हे अठरापगड जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येऊन तयार केलेले गाव आहे. साधारण तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि नंतर पेशव्यांनी निरनिराळ्या जातीधर्माच्या लोकांना महाराष्ट्र, कर्नाटक आणि हैद्राबाद प्रांतातून बोलावून जमिनींची वतनं, इनामदारी देऊन गावे वसवली आणि उत्तम व्यवस्था लावली. त्यापैकी कोपरगांव हे एक गाव आहे.

सांगली भागातून आढाव आडनावाच्या मराठमोळ्या लोकांना आणि इतर समाजातील काही मंडळींना कोपरगांवात वतन देऊन देखरेखीला नेमले. तेव्हा गावाचे सरपंच किंवा वतनदार यांचा शब्द अंतिम असायचा. गावाची वेस बांधायची ठरली, तेव्हा कामाचा शुभारंभ देवाला नारळ वाढवून म्हणजेच ग्रामदैवताला अर्पण करून करण्यात आला.

ग्रामदैवतांची स्थापना

शंकर भगवान : विश्वनिर्माता म्हणून बिरोबाच्या रूपात  स्वीकृत.

लक्ष्मीआई (ग्रामदेवता) : चैतन्यशक्ती म्हणून बाजारतळात  स्थापन.

वीर मारूती : गावाची दक्षिण दिशा सुरक्षित राखणारा रक्षक म्हणून सराफकट्टा येथे दक्षिणाभिमुखी  स्थापित. यालाच वेशीवरचा किंवा विसावा मारूती म्हणतात. ही सगळी स्थाने स्मशानाच्या पंचक्रोशीत दिसतात, कारण त्या काळी कोपरगांवात मृत्यूदर फार मोठा होता. साथीचे रोग, पटकी, देवी, काॅलरा असे जीवघेणे आजार पसरलेले असत. लक्ष्मीआई हातात आसूड घेऊन उभी राहिली, तिचे वाहन रेडा  जो राक्षसी प्रवृत्तीचे प्रतीक मानला जातो, पण देवीच्या शक्तीखाली नम्र राहतो. ती कडुलिंबाखाली वास्तव्य करते. आयुर्वेदात कडुलिंबाला जे महत्त्व आहे तेच या देवीचे महत्त्व सांगते. देवीच्या पूजेसाठी पाण्याच्या कलशात कडुलिंबाची डहाळी ठेवून पूजन केले जाते. उग्र स्वरूपाची असली तरी भोळ्या भक्तीने प्रसन्न होणारी ही देवी जीवन-मृत्यूचा खेळ बघत बसते.

चैत्र आमावास्येची जत्रा

चैत्र आमावास्या म्हणजे देवीची जत्रा. नवीन कडुलिंबाच्या गारव्याने न्हालेलं गाव त्या उत्सवात सामील होतं. हलगी, ताशा, तुरे, पिपाण्या यांच्या नादात देवीचे भगत, अंगात आलेल्या बायका आणि भक्त मंडळी मिरवणुकीत सहभागी होतात. पालखी मिरवणूक, आरती, आणि पुरण, वरण, खीर पुरी असा नैवेद्य दाखवून  “मरीआईचा गाडा”  म्हणजे रोगराई आणि दुःखाचे प्रतीक नदीत विसर्जन करतात. आवसेच्या रात्री नदीपात्रातील शोभेची दारू (फटाके) डोळ्यांचे पारणे फेडते आणि सगळ्या गावाला आरोग्याचा संदेश देते.

कुस्ती आणि तमाशा परंपरा

या यात्रेनिमित्ताने नदीच्या वाळूत कुस्तीचे मैदान भरते. तरुणांना व्यायामाचे आणि आरोग्याचे महत्त्व शिकवले जाते. यात्रेची सांगता कोपरगांवात उदयाला आलेल्या तमाशा  परंपरेने होते. त्यामुळेच कोपरगांवला “तमाशाची पंढरी” म्हटले जाते.

बिरोबाच्या नावानं चांग भलं…

कोपरगावातील प्रसिद्ध बिरोबा चौक  गावातील प्रत्येक घटनेचा साक्षीदार! मोर्चे, निषेध, शोकसभा, कौतुक समारंभ सगळं इथेच होतं. पूर्वीचं पहिलं वर्तमानपत्र सुद्धा ठोंबरे यांच्या घरी मिळायचं. रात्रीच्या चर्चा, गावचे निर्णय, आणि सगळ्या घटना याच ठिकाणी घडत असत.

बिरोबा साध्या माणसांचा देव

आजच्या तरुण पिढीला बिरोबा फारसा माहित नाही, कारण या देवाला बायका-मुली जात नाहीत. त्यामुळे गर्दी तुलनेने कमी असते. सध्या या देवाची व्यवस्था मैदाळ, जोरे आणि धनगर समाजाचे प्रतिष्ठित मंडळी सांभाळतात. या देवाची जत्रा डिसेंबर महिन्यात भरते. कडकलक्ष्मी जशी रोगराईपासून माणसांचे रक्षण करते, तसाच बिरोबा शेळ्या-मेंढ्या, गाई-गुरं आणि लहान लेकरांचे रक्षण करतो.

भविष्यकथनाची प्रथा

यात्रेच्या निमित्ताने आजूबाजूच्या गावातील धनगर समाजातील जाणते लोक एकत्र येतात आणि देवाला कौल लावतात. पुढील वर्षीचे पीकपाणी, पाऊसपाणी कसे असेल याचे भाकीत (वैक) सांगितले जाते. पूर्वी नक्षत्र आणि राशी यावरून हे ठोकताळे मांडले जात. अशाच रीतीने गावगाडा चालायचा. या देवाचा नैवेद्य सुद्धा अत्यंत साधा बाजी भाकरीचा! पण तोही देव आनंदाने स्विकारतो.

दसऱ्याची काठी आणि आशेचा संदेश

दसऱ्याच्या दिवशी बिरोबाची काठी गावात मिरवायला निघते. झांज-ढोलकीच्या नादात संपूर्ण गाव फिरते आणि देव सगळ्यांच्या भल्यासाठी सज्ज होतो. या उत्सवांमुळे गावात नवीन आशा निर्माण होते. हे उत्सव केवळ धार्मिक नसून संस्कृतीचे मापदंड आहेत जे आपल्याला जुने वाईट सोडून देऊन नव्याने जगायला शिकवतात.

त्र्यंबकेश्वर ते कोपरगांव टोक — दंडकारण्याची पवित्र भूमी

कोपरगांवचा पौराणिक इतिहास

trimbakeshwar
कोपरगांव

(तालुका कोपरगांव) हा परिसर दंडकारण्याचा मानला जातो. त्या परिसरातून गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. नदीच्या तीरावर कोपरगांव हे तालुक्याचे ठिकाण वसलेले आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुण्य झालेला असा हा तालुका आहे. गोदावरी नदीच्या उजव्या व डाव्या तीरावरून प्रभू रामचंद्र व सीता यांचे वनवासकाळात भ्रमण झालेले आहे.

 

त्या संदर्भात स्थळ, काळ, घटना व प्रसंगानुरूप अनेक दंतकथा ऐकिवात असून त्यांचा वर्तमान परिस्थितीशी संदर्भ लागू शकतो. गोदावरी नदीचा कोपरगांव तालुक्यात प्रवेश मोर्विसपासून होतो. ‘मोर्विस’ या गावाजवळ रामाने मारीच राक्षसाचा वध केला म्हणून मारीच – मारीस – मोर्विस असे शब्दस्थित्यंतर झाले. राम बाणाने सोनेरी हरणाचा वेध घेत असताना त्याचा नेम चुकून बाण खडकावर घसरत गेला.

 

त्या बाणामुळे खडक कापत गेला आणि त्यावर खोल तास (नळी) पडले. म्हणून त्या ठिकाणी वसलेल्या वसाहतीस (तास) चासनळी असे नाव पडले आहे. शेतकरी पेरणी झाल्यानंतर जमिनीत तास पाडतो व पाणी पिकाला भरतो, त्यामुळे ‘तास’ हा शब्द शेतकऱ्यांच्या परिभाषेत प्रचलित आहे.

मंजूर — परशुराम आणि बकुळाची कथा

चासगावच्या पूर्व दिशेला मंजूर नावाचे गाव आहे. शिवाजी महाराजांचे वंशज कै. बळवंतराव जयवंतराव राजे भोसले यांचे घराणे तेथे आहे. शाहीर परशुराम व त्यांच्या फडातील गायिका ‘बकुळा’ यांची समाधी मंजूर या गावीच आहे. बकुळेचे एकतर्फी प्रेम परशुरामावर होते. कथा अशी की, परशुरामाच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर बकुळा वावी गावाहून धावत आली आणि परशुरामाच्या देहाशेजारीच प्राण सोडला.

 

त्या गावात सर्पदंश झालेली व्यक्ती दगावत नाही. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस बिरोबाच्या (विरभद्र) मंदिरात आणून ठेवतात. ढोल-डफाच्या गजरात भाविक त्या व्यक्तीस जीवदान मिळावे अशी प्रार्थना करतात, आणि ती पूर्ण होते असे मानले जाते. म्हणून त्या गावास मंजूर हे नाव पडले असावे. स्त्रियांना त्या बिरोबा मंदिरात प्रवेश नाही.

घामोरी (धामापूर) आणि गोरक्षचिंच

‘घामोरी’ नावाचे गाव गोदावरी प्रवाहाच्या डाव्या बाजूला आहे. नवनाथ कथाचरित्रात त्याचा उल्लेख ‘धामापूर’ असा आहे. येथे अडबंगनाथाची समाधी आहे आणि समाधीजवळ चिंचेचे ‘गोरक्षचिंच’ झाड आहे. या झाडाचे फळ गरोदर स्त्रीला प्रसूतिवेदना असह्य झाल्यास उगाळून दिले जाते. म्हणून घरांमध्ये या फळांचा सन्मानाने उपयोग केला जातो.

कुंभारी — राम-सीतेची पूजास्थळ

गोदावरीच्या प्रवाहाच्या दिशेने पूर्वेकडे गेल्यास ‘कुंभारी’ नावाचे गाव लागते. वनवासकाळात राम आणि सीता या दोघांनी तेथे स्नान करून ओल्या वस्त्रांनिशी घागरीने नदीचे पाणी घेऊन शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून त्या स्थळास ‘कुंभारी’ (कुंभ – वारी) असे नाव पडले. येथे ‘राघवेश्वर’ हे शिवमंदिर दिमाखात उभे आहे.

मुर्शतपूर आणि सीतापखेडे कथा

कुंभारीच्या पुढे मुर्शतपूर गाव आहे. येथे गोदावरी नदी दक्षिणवाहिनी होते. दक्षिणवाहिनी प्रवाह शुभ मानला जातो. सीतेस तेथे स्नान करायचे होते, परंतु वस्त्र नव्हती. स्थानिक स्त्रियांनी तिला वस्त्र देऊन स्नान घातले. त्यामुळे ते स्थळ सीतेचे आप्तस्थान ठरले, आणि त्या गावास ‘सीतापखेडे’ असे नाव पडले. स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव ‘मुर्शतपूर’ झाले.

सोनारी — सोन्याचा हरीण

सीतेने स्नान केल्यानंतर पश्चिमेकडे सूर्याला नमस्कार करताना सोन्याच्या चकाकीसारखी हालचाल दिसली. तोच सोन्याचा हरीण (मारीच) होता. सीता त्यावर मोहित झाली, आणि त्या प्रसंगावरून त्या ठिकाणास ‘सोनारी’ असे नाव पडले. सोनारी हे गाव गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे.

माहेगाव देशमुख — जाधव वंशाचे स्थान

कुंभारी गावाच्या पश्चिमेस गोदावरीच्या उजव्या तीरावर माहेगाव आहे. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे पिताश्री लखुजी जाधव यांच्या वंशजांना येथे देशमुखी मिळाली होती. तेव्हापासून माहेगावास ‘माहेगाव देशमुख’ असे नाव पडले. आजही जाधव घराण्यांचे वंशज येथे वास्तव्यास आहेत.

मायगाव देवी — देवीच्या कृपेने वसलेले गाव

मंजूर गावाच्या पूर्वेस गोदावरीच्या डाव्या तीरावर मायगाव आहे. गोदावरीच्या महापुरात देवीची मूर्ती वाहत येऊन येथे तीरावर दिसली. स्थानिकांनी ती मूर्ती स्थापन करून मंदिर बांधले. देवी लक्ष्मी आई (माय) आहे असा दृष्टांत भाविकांना झाला, आणि गावाचे नाव ‘मायगाव’ पडले. देवीच्या कृपेने गावाची भरभराट झाली व ‘मायगाव देवी’ म्हणून प्रसिद्ध झाले.

हिंगणी आणि राघोबादादांचा वाडा

मुर्शतपूरच्या पश्चिमेस गोदावरीच्या उजव्या तीरावर हिंगणी गाव आहे. पेशवाई काळात याला ‘श्रीमंतांची हिंगणी’ असे म्हणत. पेशवे नारायणराव यांच्या वधाच्या कटात राघोबादादा सहभागी असल्यामुळे त्यांना कोपरगांव येथे नजरकैदेत ठेवण्यात आले. हिंगणी येथे त्यांच्या विश्रांतीसाठी भव्य वाड्याचे बांधकाम सुरू होते.

 

या वाड्याच्या भिंती दगड, चुना व शिसे यांच्या मजबुतीने बांधलेल्या आहेत. 1969 व 2006 च्या महापुरात हा वाडा पाण्यात बुडूनही नुकसान झाले नाही. वाड्याच्या आतून कोपरगांव वाड्यापर्यंत भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. बांधकाम सुरू असतानाच राघोबादादांचे निधन झाले, आणि त्यांचा अंत्यविधी हिंगणी वाड्यातच झाला. हा वाडा आज पुरातन वस्तू संशोधन खात्याकडे आहे.

डाऊच खुर्द — पिंडदान स्थळ

गोदावरी प्रवाहाच्या उजव्या तीरावर डाऊच बुद्रुक व डाऊच खुर्द अशी दोन गावे आहेत. दोन्ही गावांच्या मधून उमावती (उंबरी) नदी वाहते. वनवासकाळात रामाला पिता दशरथाच्या निधनाची वार्ता येथे समजली, आणि राम-लक्ष्मण यांनी पित्याचे पिंडदान डाऊच खुर्द येथे केले. आजही महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते.

चांदेकसारे आणि काशासूराची कथा

दंडकारण्यात काशासूर नावाचा दैत्य राहत होता. त्याच्या छळामुळे लोक भयभीत झाले होते. शंकरांनी अष्टभैरवांपैकी बालभैरवावर त्याचा वध करण्याची जबाबदारी सोपवली. लूटमार करून काशासूर चांदी, सोने आणि नगद वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचा. चांदी ठेवत त्या ठिकाणास ‘चांदे’, सोने ठेवत त्या ठिकाणास ‘सोनेवाडी’, आणि नगद ठेवत त्या जागेस ‘नगदवाडी’ असे नाव पडले.

 

बालभैरवाने काशासूराशी पाच दिवस युद्ध केले. एका तपस्वीच्या सूचनेनुसार भोजडे येथील जोगाबाई हिने बालभैरवाशी तात्पुरते विवाह करून त्याला संसारी बनवले. नंतर बालभैरवाने चैत्र शुद्ध चतुर्दशीला काशासूराचा वध केला. जोगाबाईने आत्मसमर्पण केले. आज त्या ठिकाणी भैरवनाथ-जोगेश्वरीचे मंदिर आहे व चैत्र शुद्ध त्रयोदशीला मोठी यात्रा भरते.

मढी, पोहेगाव, देर्डे, घारी आणि जेऊर — नावांची उत्पत्ती

काशासूराचे प्रेत ज्या ठिकाणी पडले ते ‘मढी’ म्हणून ओळखले गेले. तेथे मढी खुर्द व मढी बुद्रुक अशी दोन गावे आहेत. लोक प्रेत पाहण्यासाठी जमा झाले आणि त्या ठिकाणास ‘पाहा हे गाव’ म्हणत ‘पोहेगाव’ नाव पडले. प्रेताचा धड पूर्वेकडे ओढला गेल्याने त्या ठिकाणास ‘देर्डे’ नाव मिळाले. गिधाडांनी पाणी पिण्यासाठी जांब नदीच्या डोहावर जाऊन थांबत, त्यामुळे त्या ठिकाणास ‘घारी’ नाव पडले.

 

काशासूराच्या छातीचा भाग गोदावरीच्या तीरावर पडला, आणि ‘ऊर’ या शब्दावरून त्या ठिकाणास ‘जेऊर’ नाव मिळाले. जेऊर हे गाव ‘जेऊर-कुंभारी’ व ‘जेऊर-पाटोदा’ या नावांनी प्रसिद्ध आहे.

कोपरगांव — दैत्यगुरू शुक्राचार्यांची तपोभूमी

जेऊर गावाच्या पूर्वेला गोदावरीच्या उजव्या तीरावर एक बेट वसलेले होते. ती जागा दैत्यगुरू शुक्राचार्यांची तपोभूमी मानली जाते. गोदावरीचा प्रवाह त्यांच्या तपश्चर्येत अडथळा निर्माण करू लागला म्हणून त्यांनी आपल्या कोपराने नदीचा प्रवाह दूर लोटला. त्यामुळे त्या भागात नवी वसाहत निर्माण झाली, आणि त्या वसाहतीस ‘कोपरगांव’ असे नाव पडले.

Scroll to Top